शिक्षकांची कॅश क्रेडिटची खाती नुतनीकरण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी - हेमंत गडकरी
सोमेश्वर नगर - प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पगार खाती असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची कॅश क्रेडीट खाती नुतनीकरण करण्यासाठी सहा महिन्यांची वाढीव मुदत मिळावी अशी मागणी बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्याकडे केली आहे.
पुणे जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. अशा सर्व अनुदानित संस्थांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पगार खाते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहेत. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षकांचीही पगार खाती जिल्हा बँकेत आहेत. अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या पगार हमीवर जिल्हा बँकेकडून आगाऊ कॅश क्रेडिट घेतले आहे. त्यांना वार्षिक मिळणाऱ्या पगाराच्या 20 पट रक्कम कॅश क्रेडीट म्हणून दिली जाते. दरवर्षी या खात्याचे नूतनीकरण करावे लागते. मात्र यंदा कोरोनामुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. अनेक कर्मचारी आपल्या मूळ गावी अडकून पडले आहेत. अनेक शाळांत विलगीकरण कक्ष उभारले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचे जामीनदार बाहेर आहेत. ट्रिपल एक्स काही कर्मचाऱ्यांना व जामीनदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते होम क्वॉरंटाइन आहेत. काही ठिकाणच्या मुख्याध्यापकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही ठिकाणचे मुख्याध्यापक निवृत्त झाले आहेत. अशा अनेक अपरिहार्य कारणांमुळे कर्मचाऱ्यांना आपली कॅश क्रेडिटची खाती नूतनीकरण करता आली नाहीत. त्यामुळे त्यांची नूतनीकरणाची मुदत संपली आहे. अशा शिक्षकांचा पगार पूर्णपणे बँक घेऊ शकते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप होत आहे.
यासाठी बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी नूतनीकरणाची मुदत संपलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची कॅश क्रेडिटची खाती नुतनीकरण करण्यासाठी सहा महिन्यांची वाढीव मुदत द्यावी अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात व उपाध्यक्षा अर्चना घारे यांच्याकडे केली आहे. अध्यक्ष रमेश थोरात व उपाध्यक्षा अर्चना घारे यांनी ही सकारात्मक प्रतिसाद देत यावरती मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.