
सोनकसवाडीत दोन घरांवर दरोडा टाकत सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरला
Wednesday, February 17, 2021
Edit
बारामती तालुक्यातील सोनकसवाडी येथील दोन घरांवर घातक हत्यारांसह ६ जणांनी दरोडा टाकला. दोन घरांतून रोख रकमेसहित सोन्या-चांदीचे दागिने, असा सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत सहा जणांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपेश हनुमंत लोखंडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बुधवारी ( दि. १७) रोजी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास हा प्रकार घडला. २० ते २५ वयोगटातील सहा जणांनी फिर्यादीच्या घरावर दरोडा टाकला. दोघांनी बाहेर राखण करत चौघांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवत तुझ्या घरातील जे काही आहे ते काढून दे, अशी धमकी देत ८६ हजारांची रक्कम फिर्यादीकडून काढून घेतली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल असा एकूण १ लाख ६९ हजार रुपयांचा माल जबरीने चोरून नेला. फिर्यादीच्या शेताच्या शेजारी राहणाऱ्या विजय साधू लोखंडे यांच्या घरावर दरोडा टाकत चाकूचा धाक दाखवत ४७ हजार रुपयांचा सोन्याचा गंठण जबरदस्तीने नेण्यात आला.
गायकवाड मळ्यातही २ लाख २८ हजारांची चोरी
दरम्यान सोनकसवाडीच्या गायकवाड मळ्यातही चोरट्यांनी १५ हजारांच्या रोख रकमेसह सुमारे २ लाख २५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याबाबत रोहन अशोक गायकवाड यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या बंद घराचे कुलुप तोडत घरातून १५ हजारांची रोख रक्कम, ९४ हजार रुपयांचा दोन तोळ्यांचा लिंबोणी सर, ७० हजारांचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र, ४७ हजार रुपयांची बोरमाळ, २ हजार रुपयांची नथ असा, २ लाख २८ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.