
राजकीय सभांना गर्दी चालते, मग शिवजयंतीलाच निर्बंध का? शिवप्रेमींचा सवाल, निर्बंध हटवण्याची मागणी
Friday, February 12, 2021
Edit
कोऱ्हाळे बु : राज्य शासनाच्या गृह विभागाकडून गुरुवारी ( दि.११ ) शिवजयंती साजरी करण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले. यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिवजयंती जास्तीत जास्त दहा लोकांनीच एकत्रित येऊन साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे सतप्त शिवभक्तानकडून राजकीय सभेत जमलेल्या गर्दीला कोरोनाची लागण होत नाही का? सवाल उपस्थित होत आहे.
यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेऊन शिवजयंती उत्साहात साजरी करू देण्याची मागणी होत आहे. शिवजयंती उत्सव हा महाराष्ट्रात गावोगावी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा उत्सव आहे. शिवरायांचं जेवढं या महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नातं आहे. तेवढंच नातं महाराष्ट्रातील शिवप्रेमींच आणि शिवजन्मोत्सवाचं आहे . शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने व्याख्यान, नाटक, कीर्तन शाहिरी कार्यक्रम, शिवरायांच्या गीतांचा कार्यक्रम अशा सर्व साहित्य प्रकारांच्या माध्यमातून शिवरायांच्या चरित्राचा आणि विचारांचा जागर अखंड महाराष्ट्रात होत असतो. परंतू यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवजयंती उत्सवात मर्यादित लोकच सामील होऊ शकतात. तसेच व्याख्यान, नाटक, पोवाड्याचे कार्यक्रम, शोभायात्रा अशा कार्यक्रमांवर सुद्धा शासनाने निबंध घातले आहेत. जास्तीत जास्त दहा लोकं एकत्रित येऊन छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्सव साजरा करण्याचा सल्ला देखील या परिपत्रकात देण्यात आला आहे.
राजकीय नेत्यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीला कसल्याही प्रकारचे निर्बंध लावले जात नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे जग संकटात असताना कोरोना काळातच बिहार मध्ये विधानसभा निवडणुक पार पडली. या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रचार सभा हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडल्या.
आठ महिने कडकडीत लॉकडाऊन पाळल्या नंतर नुकत्याच शाळा, कॉलेज, सिनेमगृहे सूरु करण्यात आले आहेत.
राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले. राजकीय पक्षांच्या बैठका, छोटे मोठे कार्यक्रम आयोजित होऊ लागलेत.मंत्री महोदयांच्या सभा आयोजित होत आहेत. त्या सभांना हजारो कार्यकर्ते उपस्थित राहून सोशल डिस्टीन्सचा धुरळा उडवीत आहेत.
या गोष्टींना मात्र शासनाकडून कोरोनाच्या धर्तीवर कसल्याही प्रकारचे निबंध घालण्यात आले नाहीत. जरी निबंध घातले असतील तरी त्यांचे कुठल्याच राजकीय कार्यक्रमात अनुकरण केल्याचे अढळत नाही. असे असतानाही शिवजयंती उत्सवाबद्दलच शासनाचे काय वावडे आहे?
शासनाच्या या परिपत्रकामुळे शिवप्रेमींच्या मनात शासनाबद्दल चीड निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. निराश होऊन शासनाला असा उलट सवालही शिवप्रेमींकडून विचारला जात आहे.