
पुणे जिल्ह्यातील २३५३ आस्थापनांवर कारवाई करत पावणे नऊ लाखांचा दंड वसूल
Monday, April 26, 2021
Edit
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आस्थापनातील उपस्थितीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र आदेश डावलून आस्थापना सुरू ठेवणे, नियमापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावर बोलवणे, सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या २३५३ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. एकूण १५ हजार ५० आस्थापनांची तपासणी करण्यात आली. कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने अनेक निर्बंध घातले त्यात परिस्थितीनुसार वाढ करण्यात आली. खासगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली होती.
परंतु अनेक ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी काम करीत असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी ८०२ आस्थापना विरोधात साथ रोग कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर ९५२ आस्थापनांवर खटले भरण्यात आले आहेत. ६०१ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यातून ८ लाख ८९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.