
बारामती: सोमेश्वर कारखान्याची चेअरमन व्हा.चेअरमन निवड तारीख जाहीर; या दिवशी होणार निवडी
Saturday, October 30, 2021
Edit
कोऱ्हाळे बु : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता सभासदांमध्ये होती.ती आता लवकरच पूर्ण होणार आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार (दि:८) नोव्हेंबर रोजी या निवडी केल्या जाणार आहेत. दरम्यान, निवडीचे संपूर्ण अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामध्ये राष्ट्रवादीपुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्या चेहऱ्यांसह नवीन युवकांनाही संधी दिली. निवडणूकीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत सभासदांना उत्सुकता लागली होती. अखेर या निवडीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या उपस्थितीत ८ नोव्हेंबर रोजी या निवडी केल्या जातील. यात कोणाला संधी मिळणार हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेणार आहेत. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दल सभासदांमध्ये उत्सुकता लागली आहे.