
सोमेश्वर कारखाना निवडणूक: त्या फलकाची जिल्ह्यात चर्चा; गावाला उमेदवरीतून वगळल्याने केळाचा फलक लावून केला निषेध
Monday, October 4, 2021
Edit
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने पॅनल जाहीर केला. हा पॅनल जाहीर केल्यानंतर कार्यक्षेत्रात चर्चा नाही, मात्र अस्पष्ट अशी नाराजी उमटली. याचा परिणाम म्हणजे वाघळवाडी परिसरात केळाचे चित्र असलेला फलक प्रसिद्ध करण्यात आला. यामुळे खळबळ उडाली. सोशल मीडियावर हा फलक व्हायरल होताच काही काळातच फलक पोलिसांनी काढून घेतल्याचे समजते.
काल सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातील राष्ट्रवादीच्या सोमेश्वर विकास पॅनल ची यादी जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी गर्दी जास्त होती. अर्जही अधिक आले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी मेळाव्यातच कोणीही रुसू नका कोणाची मनधरणी करणार नाही असे आधीच स्पष्ट केले होते.
काल दुपारी पॅनल मधील उमेदवार निश्चित झाल्यानंतर काही काळातच एक फलक या ठिकाणी उभारण्यात आला आणि तो अत्यंत वेगाने कार्यक्षेत्रात व्हायरल झाला. या फलकावरील केळीचे चित्र स्पष्टीकरणासाठी पुरेसे होते. त्यामुळे ती चर्चा जास्त झाली. काहीही न बोलता या फलकाने कार्यक्षेत्रामध्ये अनेकांच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जागा मिळवली. मात्र याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तो फलक काढून घेतल्याची चर्चा आहे.