
सोमेश्वर कारखाना निवडणूक: ५ युवा चेहरे व ११ मातब्बरांना संधी देत विद्यमान संचालक मंडळातील १६ जणांना दिला नारळ
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवारांची बहुप्रतिक्षित यादी जाहीर झाली असून विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व उपाध्यक्ष शैलेश रासकर यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे, तर माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी एका ब्रेकनंतर पुन्हा एन्ट्री घेतली आहे. सहयोगी शेतकरी कृती समिती आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. विद्यमान संचालक मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, शांताराम कापरे रिपीट झाले असून सोळा जणांना नारळ दिला आहे. तर पाच युवकांसह बारा चेहरे पूर्ण नवे आहेत.
विशेष म्हणजे या नव्या चेहऱ्यांमध्ये सतीश काकडे यांचे सुपुत्र अभिजित काकडे यांना पवार यांनी संधी दिली आहे. सोमेश्वर कारखान्यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीचे ज्याला तिकीट मिळणार तो संचालक होणार, असे गणित असल्याने शेकडो इच्छुक गॅसवर होते. पुरुषोत्तम जगताप यांनी कारखाना कर्जमुक्त करत नामांकित पंक्तीत नेऊन ठेवल्याने त्यांच्यावर पक्षनेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. यापूर्वी दोन संचालक मंडळात अध्यक्ष राहिलेले राजवर्धन शिंदे या अनुभवी चेहऱ्याला पुन्हा सामावून घेण्यात आले आहे.
पुरंदरला चार, खंडाळ्याला एक उमेदवार दिला असून बारामतीच्या जिराईत भागात प्रथमच दोन उमेदवार दिले आहेत.
सिद्धार्थ गीते, उत्तम धुमाळ, नामदेव शिंगटे, किशोर भोसले, संग्रामराजे निंबाळकर, लालासाहेब नलावडे आदी सोळा विद्यमान लोकांना यंदा संधी मिळालेली नाही. विद्यमानच्या आधी काम केलेले विश्वास जगताप, आनंदकुमार होळकर यांना पुन्हा संधी मिळाली आहे. नवनाथ उद्योगसमूहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे, नीरा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब कामथे, कोऱ्हाळे खुर्दच्या माजी सरपंच प्रणिता खोमणे या मातब्बरांना प्रथमच एन्ट्री मिळाली आहे. काँग्रेसकडून अनंत तांबे या चेहऱ्याला न्याय मिळाला आहे.
पाच युवा चेहरे
शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे पुत्र अभिजित काकडे यांच्यासह जितेंद्र निगडे, ऋषिकेश गायकवाड, प्रवीण कांबळे, रणजित मोरे हे युवा चेहरे राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाने आपल्या पॅनेलमध्ये आवर्जून समाविष्ट केले आहेत.
राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे : निंबूत-खंडाळा गट- जितेंद्र नारायण निगडे (गुळुंचे), लक्ष्मण गंगाराम गोफणे (खंडोबाचीवाडी), अभिजित सतीशराव काकडे (निंबूत) मुरूम-वाल्हे गट - पुरुषोत्तम रामराजे जगताप (वानेवाडी), राजवर्धन शिवाजीराव शिंदे (मुरूम), ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड (करंजेपूल) होळ-मोरगाव गट - आनंदकुमार शांताराम होळकर (सदोबाचीवाडी), शिवाजीराजे द्वारकोजीराव राजेनिंबाळकर (वडगाव निंबाळकर), किसन दिनकर तांबे (तरडोली) कोऱ्हाळे-सुपा गट - सुनील नारायण भगत (कोऱ्हाळे), रणजित नंदकुमार मोरे (थोपटेवाडी), हरिभाऊ महादेव भोंडवे (भोंडवेवाडी) मांडकी- जवळार्जुन गट - विश्वास मारुती जगताप (मांडकी), बाळासाहेब ज्ञानदेव कामथे (खळद), शांताराम शिवाजी कापरे (नाझरे) अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी - प्रवीण युवराज कांबळे (होळ) इतर मागासवर्गीय - शैलेश पंढरीनाथ रासकर (खंडोबाचीवाडी) भटक्या विमुक्त जाती-जमाती - अनंत विनायक तांबे (जेऊर) महिला राखीव - कमल शशिकांत पवार (भादवडे) प्रणिता मनोज खोमणे (कोऱ्हाळे खुर्द) सोसायटी मतदारसंघ - संग्राम तानाजी सोरटे (मगरवाडी)