
मोठी बातमी: अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा स्थगित; स्पर्धेचे स्टेज कोसळले
Friday, April 8, 2022
Edit
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला मागील दोन दिवसांपासून सुरुवात झाली. साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुलमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.
परंतु, सातऱ्यात सुरू झालेल्या अवकाळी आणि वादळी पावसामुळं या स्पर्धेला मोठा फटका बसल्याचं दिसून आलंय. या अवकाळी पावसामुळं महाराष्ट्र केसरी कुस्तीचा स्टेज कोसळल्यानं पुढील सूचना मिळेपर्यंत स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. पावसामुळं कुस्ती पैलवानाबरोबरच कुस्ती शौकिनांनाचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळत आहे. 5 एप्रिलपासून साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला आहे. तब्बल 59 वर्षांनंतर साताऱ्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचा मान मिळालाय.
ज्यामुळं सातऱ्यामधील कुस्ती शौकिनांना मोठा आनंद झाला आहे. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावण्यासाठी 900 पैलवान शड्डू ठोकून सज्ज आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेले दोन वर्ष महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा झाली नव्हती. मात्र, आता निर्बंधमुक्तीनंतर पुन्हा एकदा साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहे. त्यामुळे पैलवान आणि कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु, अवकाळी पावसानं कुस्तीप्रेमींच्या आनंदावर पाणी फेरलंय.