
निंबोडीच्या जिरायती शेतीतसुद्धा मोजणीसाठी पैसे मागणारी त्याची घाणेरडी लाचखोरी.. शेवटी पायली भरली.. आणि सापडला!
Wednesday, June 15, 2022
Edit
इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथील शेतकऱ्याच्या मोजणीनंतर हद्द कायम करण्यासाठी नेहमीप्रमाणे भूमिअभिलेख खात्यातील मोजणीदाराने लाच मागितली आणि तब्बल 20 हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोजणीदार राजाराम दत्तात्रय शिंदे याला पकडले…!
इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथील शेतकरी श्री घोळवे यांच्या जमिनीची मोजणी त्यांनी मागवली होती. ही मोजणी आल्यानंतर त्या मोजणीची हद्द कायम करण्यासाठी घोळवे हे भुमिअभिलेख खात्याच्या कार्यालयात चकरा मारत होते. हद्द कायम करून देण्यासाठी मोजणीदार राजाराम शिंदे हा टाळाटाळ करत होता.
त्याने या घोळवे यांच्या पुतण्याकडे लाचेची मागणी केली. त्यावरून घोळवे यांच्या पुतण्याने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठले. विभागाने या प्रकरणी केलेल्या पडताळणीत शिंदे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला आणि यामध्ये राजाराम शिंदे हा वीस हजार रुपये घेताना रंगेहाथ सापडला.
या शिंदे विषयी इंदापूर तालुक्यात प्रचंड नाराजी होती. तो पैशाशिवाय काहीच काम करत नाही अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा असायची, मात्र जो सापडतो तो चोर आणि इतर मात्र साळसूदपणाचा आव आणतात. भुमिअभिलेख खात्यात कशाप्रकारे लाचखोरी चालते त्याचे शिंदे म्हणजे एक फक्त हिमनगाचे टोक आहे.