
बारामती: शेतकरी संघटनेने दिला वडगाव निंबाळकर येथील कर्जदाराला घराचा ताबा...
Saturday, August 13, 2022
Edit
वडगाव निंबाळकर तालुका बारामती जिल्हा पुणे येथील अरविंद साहेबराव यादव यांनी बारामती सहकारी बँक शाखा निरा या बँकेचे व्यवसायासाठी वेळोवेळी कर्ज घेतले होते त्यांनी कर्जाचे हप्तेही वेळोवेळी फेडलेले आहेत परंतु नोटाबंदी व कोरोना या साथीच्या रोगामुळे त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला.. त्यामुळे अलीकडच्या काळात त्यांना बँकेचे कर्ज फेडता आले नाही.. वास्तविक यादव हे बारामती सहकारी बँकेचे 1985 सालापासून कर्ज खातेदार आहेत. आतापर्यंत त्यांनी लाखो रुपये कर्ज परतावा म्हणून दिलेले आहेत. त्यामुळे बँकेने यादव यांच्याकडे सहानुभूतीने पाहून त्यांना कर्ज वसुलीसाठी सहकार्य करणे अपेक्षित होते. परंतु बँकेने तसे न करता तातडीने त्यांच्यावर नियमबाह्य कारवाई करून यादव यांचे कुटुंबीय यांना राहत्या घरातून बाहेर काढून बेघर केले. यादव कुटुंबीयांना बाहेर काढते वेळी यादव कुटुंबीयांनी बँक अधिकाऱ्यांना विनवणी केली की आमचे या घरा व्यतिरिक्त कोठेही घर नाही. आम्ही लहान मुलांसह बेघर होऊ. परंतु बँक अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता यादव यांना घराबाहेर काढत दुकान व घराचा ताबा घेतला.. त्यामुळे यादव कुटुंबीय गेली एक महिन्यापासून नातेवाईक, मित्र यांच्या घरी निवाऱ्याला राहत होते. बाहेर राहत असताना यादव कुटुंबीयांच्या मनात सामूहिक आत्महत्या सारखे विचार येऊ लागले. सदर प्रकाराची माहिती शेतकरी संघटनेला मिळाली.. शेतकरी संघटनेने यादव कुटुंबीयांना विश्वासात घेऊन धीर देऊन सांगितले की आपण कर्ज बुडवायला किंवा थकवायला विजय मल्ल्या नाहीत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्यावर कर्ज झाले आहे. त्यातून नक्कीच मार्ग निघेल असे सांगून यादव कुटुंबीय यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग रायते, पुणे जिल्हाध्यक्ष हनुमंत वीर ,बारामती तालुकाध्यक्ष किरण मदने,इंदापूर तालुका अध्यक्ष हरिदास पवार, युवा आघाडीचे दादा किरकत, सचिन कोथिंमिरे, श्रीकांत गावडे, शशिकांत आरडे, प्रशांत मानकर अनिल शिंदे आधी कार्यकर्त्यांनी यादव कुटुंबीयांना कुलूप लावलेल्या घराचा व दुकानाचा ताबा देऊन प्रवेश केला.