
सोमेश्वरचा पहिला हप्ता २८०० रुपये जाहीर; हप्ता ५ डिसेंबरपर्यंत खात्यावर वर्ग करणार - पुरुषोत्तम जगताप
Thursday, December 1, 2022
Edit
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाकरीता कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रति मे.टन २८०० /- रुपये प्रमाणे पहिला हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आजअखेर २,८१,३०७ मे. टनाचे गाळप केले असुन सरासरी १०.६२ टक्के साखर उतारा राखीत २,९४,५५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दि. १५/११ अखेर पर्यंत गाळ्पास आलेल्या सुमारे १,५९,७६० मे.टन ऊसाचे प्रती मेट्रीक टन २८०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता ५ डिसेंबरपर्यंत वर्ग करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
जगताप पुढे म्हणाले की, आपल्या कारखान्याच्या कोजन प्रकल्पामधुन आजअखेर २ कोटी ८२ लाख ५ हजार २७३ युनिट्स वीजनिर्मिती केली असुन १ कोटी १९ लाख ६८ हजार ४२५ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून १६ लाख ६८ हजार ३४९ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असुन सोबत ४ लाख ५० हजार ३४३ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. जगताप पुढे म्हणाले की, गतवर्षीप्रमाणे याही हंगामात आपला कारखाना सुरळीतपणे द यशस्वी पार पडण्यासाठी आपणा सर्व सभासद शेतकरी, ऊसतोड वाहतुकदार-मजुर, कारखान्याचे अधिकारी-कर्मचारी यांचे सहकार्य लाभेल असा मला विश्वास आहे. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक उपस्थित होते.