
'सोमेश्वर कारखान्याच्या' कार्यक्षेत्रात ऊसावर ड्रोनद्वारे औषध फवारणी
Sunday, February 6, 2022
Edit
सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व आय . पी . एल . अॅग्रोटेकच्या वतीने ऊस पिकावर ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणी करण्यात येत आहे. सध्यस्थितीत उसावर तांबेरा, लाल टिपके या रोगाचा व कांडी कीड, शेंडे कीड या किडींचा प्रादुर्भाव वाढला असल्याने ऊस पिकावर परिणाम झाला आहे.
साखर उताऱ्यावर अनिष्ट परिणाम होत असून त्यांचे नियंत्रण करण्यासाठी वाढ झालेल्या उसावर औषध फवारणी करणे शक्य नसल्याने किड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी कारखान्याच्या वतीने सभासदांच्या शेतावर ड्रोनच्या साहाय्याने फवारणीचे प्रात्यक्षिके घेतली करंजेपूल येथे ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. सोमेश्वरचे संचालक संग्राम सोरटे व ऋषिकेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून करंजेपूल येथे याबाबत नुकतेच प्रात्यक्षिक घेण्यात आले. विठ्ठल गायकवाड यांच्या शेतात हे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
कार्यक्रमास संचालक संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, जितेंद्र निगडे, प्रवीण कांबळे तसेच कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी बापूसाहेब गायकवाड, ऊस विकास अधिकारी विराज निंबाळकर यांच्यासह उपस्थितीत सुमारे २०० शेतकऱ्यांनी ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी कशी करतात याची प्रत्यक्ष माहिती घेतली.
आय.पी.एल. अॅग्रोटेकचे संचालक इंद्रजीत जगताप यांनी ड्रोनविषयी मार्गदर्शन केले. तर ऊस विकास अधिकारी विराज निंबाळकर यांनी कीड रोगाबाबत माहिती देत शेतकऱ्यांनी ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी करावी असे आवाहन केले . सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने परिपत्रक प्रसिध्द केले असून ठिकठिकाणी औषध फवारणी प्रात्यक्षिके घेतली जात आहेत.