
बत्तीस वर्षांनंतर वारीत जुने मित्र भेटले
Saturday, July 2, 2022
Edit
सोमेश्वरनगर - हेमंत गडकरी
आलिंगणी सुख वाटे
प्रेम चिदानंदी घोटे
हर्षे ब्रह्मांड उतटे
समुळ उठे मीपण...
पंढरीची वारी हा एक चैतन्याचा व मांगल्याचा सोहळा असतो. वारीत अनेक आनंदमय घटनांची प्रचिती येते. वारी सुरू असतानाच कुणाला कुठल्या रुपात पांडुरंग भेटेल हे सांगता येत नाही. संत सोपानदेव महाराजांच्या वारीत बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने चक्क एका वारकऱ्याला आलिंगन दिले व तेव्हा कळाले की तब्बल बत्तीस वर्षांनंतर ही मित्रभेट जणु दोघांनाही साक्षात पांडुरंग भेटला.
संत सोपान काका पालखीचे प्रस्थान सासवडहून झाले आहे. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक या गावात ही पालखी मुक्कामी होती. नारायणपूर येथील सद्गुरु नारायण महाराजांची दिंडी या वारीत सहभागी झाली आहे. याच दिंडीतील राजाराम पोळ हे वारकरी विठू नामाच्या भजनात दंग असतानाच त्यांच्यासमोर पालखीच्या बंदोबस्तासाठी असणारा खात्या वर्दीतील एक पोलीस कर्मचारी येतो. दोघांची काही क्षण नजरा नजर होते व पुढच्याच क्षणी दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडतात. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणारे पोलीस हवालदार महेंद्र फणसे व वारकरी राजाराम पोळ हे दोघे १९८७ ते १९९० या काळात भोर तालुक्यातील स्वामी विवेकानंद पंचक्रोशी आदर्श विद्यालय नेरे या ठिकाणी एकत्र शिकत होते. दोघे ही एकमेकांचे जिवलग मित्र होते. पुढे दहावीनंतर राजाराम पोळ हे महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबई ला गेले तर महेंद्र फणसे यांनी भोर ला आपले शिक्षण पूर्ण केले. व १९९६ साली पोलिस दलात रुजू झाले. तर राजाराम पोळ हे त्यांचा प्लंबिंग व इलेक्ट्रिक चा व्यवसाय करतात. गेली आठ वर्षे ते सोपान काकांच्या वारीत नारायणपूर येथील विश्व चैतन्य परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज या दिंडीत होत आहेत. मात्र या वर्षीची वारी त्यांच्यासाठी आनंद वारी ठरली आहे.
मित्र भेटीचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. माऊली व सोपान काकांच्या कृपेनेच आज माझ्या जुन्या मित्राची भेट झाली व माझी वारी खऱ्या अर्थाने सार्थकी लागली असे भाव वारकरी राजाराम पोळ यांनी व्यक्त केले. तर बंदोबस्ताच्या तणावात जुन्या जिवलग मित्राची भेट झाल्याने दिवसभराचा तणाव थकवा कुठे पळून गेला हे कळलच नाही अशी भावना पोलीस हवालदार महेंद्र फणसे यांनी व्यक्त केली. त्यामुळे एकादशीच्या आधीच या दोघांनाही पांडुरंग भेटला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.