तालुक्यातील हायमास्ट दिवे बनले शोभेच्या वस्तू
कोऱ्हाळे बु - बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात लाखो रुपये खर्चुन बसविलेले हायमास्ट दिवे देखभाल व दुरुस्तीअभावी बंद आहेत. ग्रामपंचायत व ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हायमास्ट बंद ठेवण्यासाठीच निधी दिला होता का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. लख्ख प्रकाश असल्याने या हायमास्टचा परिसरातील ग्रामस्थांना आधार मिळत आहे.
हायमास्टसाठी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून निधी मिळतो. याशिवाय ग्रामनिधी खर्च, खासदार व आमदार निधी, समाजकल्याण विभागाचा वीस टक्के निधी, जिल्हा वार्षिक योजना निधी, जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभागाचा निधी यातून तालुक्यात शेकडो हायमास्ट दिवे बसविण्यात आले. मात्र वर्षभरापूर्वीच काही भागांतील हायमास्ट दिवे बंद पडल्याने त्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. गावागावातील देवीच्या मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोरोनामुळे मंदिर दर्शनासाठी बंद असली तरीही ग्रामस्थ लांबून दर्शन घेत आहेत. होळ येथील ढगाईदेवी मंदिर व भैरवनाथ मंदिर परिसरात, थोपटेवाडी ग्रामपंचायतीसमोर असलेले हायमास्ट दिवे बंद असल्याने याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.