-->
बारामतीत टिप्परने पुन्हा एकदा घेतला निष्पाप व्यक्तीचा बळी; अपघातात सायकलस्वारला डंपरने चिरडले

बारामतीत टिप्परने पुन्हा एकदा घेतला निष्पाप व्यक्तीचा बळी; अपघातात सायकलस्वारला डंपरने चिरडले

बारामतीत रस्ते मृत्यूच्या वाटा ठरत आहेत. दोन महिन्यांपूर्वी बाप-लेकींचा बळी घेणाऱ्या हायवा डंपरनंतर, आज पुन्हा एकदा निर्दोष वृद्धाचा जीव रस्त्यावर गेला. बारामतीत सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. दोन महिन्यांपूर्वीच एका भीषण अपघातात बाप आणि दोन लेकींचा बळी गेला होता. त्या जखमांचे डाग अजूनही ताजे असतानाच आज पुन्हा एकदा बारामती शहर हादरलं. डंपरखाली चिरडल्या गेल्याने एका वृद्धाने आपले आयुष्य गमावले आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
     आज सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता बारामती शहरातील फलटण चौकात ही घटना घडली.
          हायवा डंपर अचानक आलेल्या सायकलस्वारावर धडकला. मृतकाचे नाव - मारुती उमाजी पारसे (वय ७५), रहिवासी आनंदनगर. फलटण चौक बारामती) यांचा डंपरच्या चाकाखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातातील हा हायवा शेळके कन्स्ट्रक्शनचा असल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी या डंपर वर तुफान दगडफेक केली.

         अपघातानंतर संतापाचा स्फोट. घटना कळताच परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी हायवा डंपरवर दगडफेक केली. रस्त्यावर घोषणाबाजी, गोंधळ, आणि भीतीचं वातावरण. थोड्याच वेळात नागरिक रस्त्यावर उतरले आणि जोरदार रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. नागरिकांचा थेट आरोप होता, डंपर चालकांवर कारवाई होत नाही, म्हणून मृत्यू थांबत नाहीत. प्रशासन गंभीर नाही, म्हणून हे राक्षसी हायवा बिनधास्त धावत आहेत. आता आम्ही गप्प बसणार नाही, कारवाई झालीच पाहिजे! हायवा डंपरना शहरात प्रवेश बंद करा. दोषी चालकांवर खटले चालवा. ट्रॅफिक व्यवस्थेवर तात्काळ लक्ष द्या, अन्यथा आमचा संताप उग्र होईल आणि मग रस्त्यांवर काय होईल याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा यावेळी देण्यात आला.
    शहरात अनियंत्रित वेगाने धावणाऱ्या हायवा डंपरवर कठोर नियंत्रण आणावे आणि वारंवार अपघात करणाऱ्या चालकांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच, फलटण चौक आणि शहरातील गर्दीच्या ठिकाणी सिग्नल, सीसीटीव्ही आणि ट्रॅफिक पोलीस तैनात करण्यात यावे, अशी मागणी बारामतीकर करत आहेत.
        बारामतीतील रस्ते आता जीवघेणे ठरत आहेत. लोकांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या या हायवा डंपरांना जरासंही आवरलं नाही, तर बारामतीकरांचा राग कोणत्या थराला जाईल हे सांगता येणार नाही. असा इशारा बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी दिला.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article