
मोरगाव: चिंचवड देवस्थानच्या वतीने गणेशकुंड परिसराची दुरुस्ती
Thursday, June 17, 2021
Edit
बारामती / मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता बारामती येथील गणेश कुंड परीसराचे गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. नदीवरील पुलाचे सरक्षक कठडे व शेजारील भराव वाहून गेला होता. याच्या दुरुस्तीचे काम चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने सुरु केले असल्याची माहीती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
गेल्यावर्षी ऑक्टोबर महीन्यामध्ये मध्ये अवकाळी पावसामुळे कऱ्हानदी पात्राने रुद्र रुप धारण केले होते. यामध्ये नदी पात्राशेजारील अनेक शेतकऱ्यांच्या जमीनीतील माती वाहुन गेल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते . मोरगाव येथे गणेश कुंडाशेजारी नदीपलीकडे असणाऱ्या पवळी येथे महान साधु मोरया गोसावी जन्मस्थळ आहे. दसऱ्याला सीमोल्लंघनासाठी मयुरेश्वराचा पालखी सोहळा नदीपलीकडे जातो . नदीपात्रात असलेल्या बंधाऱ्यातील पाणी सोडून दिल्याशिवाय नदीपलीकडे जाता येत नव्हते . यामुळे सीमोल्लंघन व जन्मस्थळाकडे जाण्यासाठी मुंबई येथील गणेश भक्त अमृतेताई यांनी गणेश भक्तांसाठी लाखो रुपये खर्च करुन पुल बांधुन दिला आहे.
गतवर्षीच्या पावसामुळे या पुलाशेजारील भराव वाहुन गेला होता. तसेच पुलाचे संरक्षक कठडे, गणेश कुंड परीसराचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे मोरगावचे सरपंच निलेश केदारी यांनी चिंचवड देवस्थान ट्रस्टकडे दुरुस्तीची मागणी केली होती. यानुसार देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव, विनोद पवार, विश्राम देव, आनंद तांबे, राजेंद्र उमाप यांनी हा परीसर दुरुस्त करण्याचा ठराव विश्वस्त मंडळाच्या बैठकीत संमत केला होता. दुरुस्तीचे काम सध्या वेगाने सुरु आहे.